गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक!

चाकण : गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक किलो पेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (२८ मे) रात्री खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे करण्यात आली.
आकाश सिंह अजयप्रताप सिंग ठाकूर ( वय २६, निघोजे, खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार भैरबा यादव यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथे एक तरुण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आकाशसिंग ठाकूर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६० हजार ५०० रुपये किमतीचा एक किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
दिघी येथे तरुणाकडून २५९ ग्रॅम गांजा जप्त
दिघी पोलिसांनी इंद्रायणी नगर येथे एका तरुणाकडून १२ हजार ९५० रुपये किमतीचा २५९ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. स्वामी भागवत माने (वय २३, आळंदी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार योगेश नागरगोजे यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी स्वामी माने हा इंद्रायणीनगर येथे गांजा विक्रीसाठी आला होता.

स्वयंघोषित भाईची पिंपळे सौदागर मध्ये दहशत!
पिंपरी : स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या तरुणाने पिंपळे सौदागर परिसरात दहशत निर्माण केली. तसेच एका तरुणाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. ही घटना बुधवारी (२८ मे) रात्री पिंपळे सौदागर येथे घडली.
फहरान अल्ली शेख (वय २०, पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज नामदेव सुतार (वय ३०, नखाते वस्ती) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे त्यांच्या मित्रासोबत रस्त्याने पायी चालत जात होते. त्यांना आरोपी सुरज याने अडवले. शिवीगाळ, दमदाटी करून आपण या एरियाचा भाई असल्याचे सुरज याने सांगितले. मला चुपचाप पैसे द्यायचे म्हणत धमकी दिली. शेख यांनी पैसे देण्यास नकार दिला असता सुरज याने मारहाण करून शेख यांच्या खिशातून जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेतले.