मिक्सरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू!

पिंपरी: भरधाव आलेल्या मिक्सरने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी वरील दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चिखलीतील डायमंड चौक, कुदळवाडी येथे घडला.
याबाबत अमोल सखाराम ठोसर (वय 36, सोमाटणे फाटा) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिक्सर चालक आरोपी बिहारी पांडुरंग जाधव (वय 41, काळे कॉलनी, चर्होली याला अटक केली आहे. वैष्णवी सुजित दिघे (वय 22) असे मृत तरुणीचे नाव असून सीमा बजरंग ढमाले (वय 30) असे जखमी महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीची मेहुणी वैष्णवी दिघे आणि एक महिला सीमा ढमाले या दोघी वैष्णवीच्या दुचाकीवरून जात होत्या. भरधाव आलेल्या मिक्सर ट्रक वरील चालकाने दुचाकीला धडक दिली .या धडकेत वैष्णवी व सीमा यांच्या अंगावरून मिक्सरचे चाक गेले. यात वैष्णवीचा मृत्यू झाला. चिखली पोलीस पुढील तपास करत आहे.

महापालिकेचे झाडे लावण्याचे टेंडर देण्याच्या बहाण्याने अकरा लाखाची फसवणूक!
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे झाडे लावण्याचे टेंडर मिळवून देतो असे सांगून एका तरुणाची 11 लाख 61 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 20 एप्रिल ते 14 सप्टेंबर 2024 दरम्यान भोसरीतील लांडगे आळी येथे घडली.
संदेश कुमार नंदकुमार लांडगे (वय 32 ,लांडगे आळी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अभिजीत संतोष गायकवाड (भोसरी )यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून टेंडर मिळवण्यासाठी वेळोवेळी 17 लाख 49 हजार रुपये घेतले त्यापैकी फक्त पाच लाख 88 हजार रुपये परत केले. टेंडर मिळाल्याचे खोटे सांगून आरोपीने बनावट पत्राची प्रत फिर्यादीला दिली आणि त्यांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

