xमतरुपी आशिर्वाद द्या, अन्यथा लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेईन : रवी राणा

अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतंरुपी आशीर्वाद द्या, नाही तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. अमरावतीत आज महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या विधानानंतर विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.
महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये केली पाहिजे. आज सरकारने तुम्हाला १५०० रुपये दिले आहेत. उद्या तुमचा भाऊ म्हणून मी ही रक्कम तीन हजार करण्याची विनंती सरकारकडे केली, तर तुम्हाला तीन हजार मिळू शकतात. पण ते तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून मतरुपी आशीर्वाद द्याल. पण जर तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन, असं आमदार रवी राणा म्हणाले.
विद्यमान सरकारने सगळ्यांना आधीच खूप काही दिलं आहे. अजूनही देत आहेत. त्यामुळे ज्याचं खाल्लं, त्याला जागलं पाहिजे, असं विचार करून तुम्ही आगामी निवडणुकीत मतदान केलं पाहिजे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्प माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. राज्यातील सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून जुलैपासून या योजनेची अंमलबजाणी केली जाणार आहे. त्यासाठी सरकारवर वर्षाला ४६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.