उस्ताद झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : पद्मश्री, पद्म भूषण, पद्म विभूषण, ग्रॅमी तसेच संगीत नाटक अकदामी यासारख्या सर्वोत्तम पुरस्कारांनी गौरविले गेलेले सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकिर हुसैन यांचे आज रात्री अमेरिकेतील रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
हृदयासंबंधी समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांचं निधन झालं. जगभरातून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच त्यांच्या जगभरातील चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
१९८३ मध्ये अभिनेता शशी कपूर यांच्यासह जाकिर हुसैन यांनी हिट अँड डस्ट या ब्रिटिश सिनेमात काम केलं होतं. याखेरीज १९९८ मध्ये साज या सिनेमातही ते रूपेरी पडद्यावर झळकले होते. ९ मार्च १९५१ मध्ये मुंबईत जाकिर हुसैन यांचा जन्म झाला. माहीम येथील सेंट माइकल्स हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले आणि काही काळ त्यांनी सेंट झेविअर्समध्येही शिक्षण घेतले. वडील उस्ताद अल्लाहरखाँ कुरेशी यांच्याकडून त्यांनी तबल्याचे धडे गिरवले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांनी पखवाज शिकायला सुरुवात केली. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी पहिली मैफल गाजविली. अमेरिकेत ही मैफल झाली होती. बाराव्या वर्षापासून त्यांनी उस्ताद अल्लारखाँ यांच्याबरोबर विविध मैफलींना वादनासाठी जाण्यास सुरुवात केली.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, जगविख्यात तबला वादक उस्ताद जाकिर हुसैन यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांचे शिष्य आणि कुटुंबियांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, जाकिर हुसैन यांच्या निधनामुळे संगीत प्रतिभा आणि सांस्कृतिक राजदूत आम्ही गमावला आहे. त्यांच्या तबला वादनाने कित्येक पिढ्यांमध्ये सेतू बांधणीचे काम केले आणि कितीतरी सीमा जोडल्या आहेत. भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्य परंपरा त्यांनी उत्तम प्रकारे पुढे नेली आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी म्हणाले की, उस्ताद जाकिर हुसैन यांच्या जाण्याची बातमी फार दुःखद आहे. सांगीत क्षेत्रात त्यांच्या निधनामुळं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चाहते आणि कुटुंबियांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. या जगाचा त्यांनी निरोप घेतला असला तरीही त्यांच्या आठवणी आणि त्यांचे वादन आपल्या नेहमीच स्मरणात राहील.