कामगाराने चोरले 5 लाख 22 हजार किंमतीची इंजेक्शन!

डी.वाय.पाटील हॉस्पिटल फार्मसी मधील प्रकार
पिंपरी : संत तुकाराम नगर येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथील फार्मसी मध्ये काम करणाऱ्या कामगाराने फार्मसी मधील 5 लाख 22 हजार 35 रुपये किंमतीचे इंजेक्शन चोरी करून फसवणूक केली. ही घटना जानेवारी 2026 ते 12 मार्च 2026 या कालावधीत डी.वाय.पाटील हॉस्पिटल, संत तुकाराम नगर येथील फार्मसी मध्ये घडली.

याप्रकरणी संदीप सुबराव लाखे (वय 45, डी.वाय.पाटील हॉस्पिटल मध्ये नोकरी, रा. घर नंबर 461, गजराज कॉलनी, गजराज मित्र मंडळाजवळ, ज्योतिबा नगर, काळेवाडी, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रथमेश रमेश शिंदे (वय 25, रा. अजिंक्यतारा सोसायटी, राम मंदिराजवळ, चिखली) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा डी.वाय.पाटील हॉस्पिटल मधील फार्मसी मध्ये कामगार आहे. त्याने स्वतःच्या फायद्यासाठी त्याच्या ताब्यात असलेल्या फार्मसी मधील 5 लाख 22 हजार 35 रुपये किमतीची इंजेक्शन लबाडीच्या इराद्याने चोरी केली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे अधिक तपास करत आहेत.

