फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
विधानसभा २०२४

माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी मतदारसंघातील महिलांना : अजित पवार

माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी मतदारसंघातील महिलांना : अजित पवार

पिंपरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महिलांना झाला आहे. अण्णा बनसोडे यांनी यासाठी चांगले काम केले. अण्णांचा प्रवास प्रेरणादायी आहे. करोना काळात शहरातील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी अण्णा बनसोडे यांनी 25 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तसेच इतर आरोग्यविषयक सुविधांसाठी सव्वा कोटींचा निधी दिला. त्यामुळे अण्णा बनसोडे हे सामाजिक भान जपणारा नेता आहेत, असे गौरव व अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. तसेच आमदार अण्णा बनसोडे यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन देखील केले. काळभोरनगर आकुर्डी येथे महायुतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, अण्णा बनसोडे हे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. त्यांचा संपर्क चांगला आहे. त्यांना त्यांचे काम करू द्या. अण्णा बनसोडे आणि महायुती यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे काम योगेश बहल हे करतील. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे उद्योग नगरीसह या शहराची मिनी भारत म्हणून ओळख झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरावर माझे प्रेम आहे.
लक्ष्मण जगताप हे माझे कार्यकर्ते होते. तसेच महेश लांडगे हे देखील माझेच कार्यकर्ते आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. या निवडणुकीतील माघार घेतलेल्या उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले. 21 जणांनी माघार घेतली. त्यातील 19 जणांनी आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला. त्या उमेदवारांचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले तसेच आभार मानले.

विरोधकांनी मोठ्या घोषणा केल्या पण…
अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून पंचसूत्रीच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा केल्या. महिलांना तीन हजार रुपये देणार असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. आम्ही 1500 रुपये देत असताना राज्याची तिजोरी खाली झाल्याचा आरोप करण्यात आला. मग आता हे तीन हजार रुपये कुठून आणणार हा प्रश्न आहे. आम्ही अशा योजना राबविताना आर्थिक नियोजन केले आहे. राज्यातील ग्राहकांना एक युनिट वीज पुरविण्यासाठी सात रुपये खर्च येतो. मात्र सोलर द्वारे निर्मित झालेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी साडेतीन रुपये खर्च येतो. त्यातील शिल्लक राहिलेले पैसे आम्ही शेतकऱ्यांसाठी देणार आहोत. आम्ही कुठलीही जादूची कांडी फिरवली नाही. आम्ही केवळ आर्थिक नियोजन केले. विरोधक लोकांना फसविण्याचे काम करत आहेत. हा त्यांचा चुनावी जुमला आहे.

पिंपरी चिंचवड शहरासाठी अजितदादांचे धोरण..पिंपरी चिंचवड शहरासाठी अजितदादांचे धोरण..
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराला आणखी जास्त पाणीपुरवठा उपलब्ध करणे गरजेचे आहे. शहराला टाटा धरणातून पाणी आणावे लागेल. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड बनवला जात आहे. पीएमपीएमएल सक्षम केली जात आहे. मेट्रोचे जाळे वाढवले जाते आहे. शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणखी जास्त राबवावे लागतील. पिंपरी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील जागेवर रमाई स्मारक होणार आहे. हे स्मारक नावाला साजेसे होणार आहे.

भाजपचा मतदार शिस्त पाळणारा..
मावळ मध्ये काही जणांनी कटकारस्थान केले. परंतु भाजपचा मतदार शिस्त पाळणारा आहे. तो मतदार महायुतीचा धर्म पाडून सुनील शेळके यांना मतदान करेल. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. सुनील शेळके यांना भाजपने मदत केली पाहिजे. महायुतीच्या माध्यमातून राज्यासाठी मोठी ताकद उभी करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, संदीप वाघेरे, योगेश बहल, कुणाल वाव्हळकर, चंद्रकांता सोनकांबळे, कविता अल्हाट, अनुप मोरे, हाजीभाई शेख, सुजाता पालांडे, बाळासाहेब वाल्हेकर, शत्रुघ्न काटे, वर्षा जगताप, वैशाली काळभोर, माई काटे, संजय काटे, निलेश तरस, राजेश वाबळे, शैला पाचपुते, सरिता साने, युसुफ कुरेशी, तुषार हिंगे आदी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"