अंबाबाईच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
कोल्हापूर, प्रतिनिधी : नवरात्रोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना राज्यभरात देवींच्या मंदिरांमध्ये तयारीची लगबग सुरू आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातही नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून मंदिर स्वच्छता व रंगरंगोटीचे काम सुरू असून आज मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी सुरू असून आज शनिवारी देवीच्या नित्य व उत्सव काळातील चांदीच्या दागिन्यांची स्वच्छ्ता करण्यात आली असून उद्या रविवारी देवीच्या मौल्यवान हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात देवीला नित्यालंकारामध्ये म्हाळुंग, बोरमाळ, कवड्याची माळ, पुतळ्याची माळ, ठुशी, कुंडल, १६ पदरी चंद्रहार,सोन किरीट, बोरमाळ,कर्णफुले, मासोळी, चाफेकळी हार; कोल्हापुरी साज; मंगळसूत्र; ११६ पुतळ्याची माळ, लप्पा, सात पदरी कंठी हे सर्व दागिने देवीला घालण्यात येत असतात. दागिने तब्बल ३०० वर्षापूर्वीचे असल्याने त्यांची निगा आणि स्वच्छ्ता देखील खूप काळजी पूर्वक करण्यात येत असते तर देवीच्या सोन्याच्या पालखीचीही स्वच्छ्ता करण्यात येते.
गाभाऱ्याच्या स्वच्छतेसाठी आज सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत भक्तांना अंबाबाईच्या मुख्यमूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. मात्र भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी देवीची उत्सव मूर्ती सरस्वती मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सायंकाळी आरती आणि सालंकृत पूजा झाल्यानंतर मूळ उत्सवमूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. तसेच देवीच्या दैनंदिन वापरातील चांदी अलंकारासह साहित्याची ही स्वच्छता करण्यात आली असून गरुड मंडपाची प्रतिकृती ही उभारण्यात येत आहे.