संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून

एक देश, एक निवडणूक विधेयकाची शक्यता ?
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही घोषणा केली. या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवर (ट्विट) म्हटले की, राष्ट्रपतींनी भारत सरकारच्या शिफारशीनुसार २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीत हिवाळी अधिवेशन २०२४ साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
जुन्या संसद भवनात होणार संविधान दिन साजरा
२६ नोव्हेंबर रोजी राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सरकार संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आयोजित करेल.संविधान सदनाच्या (जुने संसद भवन) सेंट्रल हॉलमध्ये विशेष संयुक्त बैठक होणार आहे.१९४९ मध्ये येथे संविधान स्वीकारण्यात आले. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू झाली. संविधान दिन हा मुळात राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जात होता.२०१५ मध्ये, भाजप सरकारने बी.आर.आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे नाव बदलून संविधान दिन केले.
‘वन नेशन वन इलेक्शन’विधेयक मांडले जाऊ शकते
केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात ‘एक देश एक निवडणूक’विधेयक आणि वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मांडू शकते. जेपीसी सध्या दोन्हीचा आढावा घेत आहे. नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार एक देश, एक निवडणूक या दिशेने काम करत असल्याचे संकेत दिले होते. या अंतर्गत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार आहेत.