पीएमपीएमएल तिकीट दरात वाढ होणार?

सर्वसामान्यांचा प्रवास महागणार
पुणे : नागरिकांना कमी खर्चात एका भागातून दुसऱ्या भागात जाता यावे यासाठी पीएमपीएमएल बस सेवा पुरविते. दररोज सुमारे १३ ते १४ लाख प्रवासी पीएमपी सेवेचा फायदा घेतात. शहरातील विविध भागांमध् पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत पीएमपीच्या बस धावत असतात. नागरिकांना सेवा देताना पीएमपीएमएल चा खर्च वाढत आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) तोट्यात दर वर्षी वाढ चालला आहे. त्यामुळे याचा भुर्दंड विनाकारण पुणे ,पिंपरी-चिंचवड महापालिकेला सहन करावा लागतो. त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी पीएमपीने तिकीट दरात वाढ करावी, अशी मागणी ‘पीएमपी’कडे करण्याची तयारी पुणे महापालिकेने सुरू केली आहे. ‘पीएमपी’ने गेल्या आठ वर्षांत तिकिटाच्या दरात एकदाही वाढ न केल्याने ही मागणी मान्य होऊन यंदाच्या वर्षी तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी पीएमपीएमएल कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतदेखील पीएमपी सेवा देते. पीएमपी कंपनीचा उद्देश हा नफा कमाविणे नसून, सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सेवा देणे हा आहे. त्यामुळे ही सेवा देताना पीएमपीला जो तोटा होईल ती रक्कम दोन्ही महापालिकांनी भरून द्यावी, असा आदेश राज्य सरकारने दोन्ही महापालिकांना दिलेला आहे. ‘पीएमपी’ला होणाऱ्या एकूण तुटीमधील ६० टक्के रक्कम ही पुणे महापालिका, तर ४० टक्के रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिकेला देणे बंधनकारक आहे.
सार्वजनिक वाहतूक पुरविण्यासाठी पीएमपी ही स्वतंत्र कंपनी स्थापन करताना पहिली पाच वर्षे या कंपनीची तूट दोन्ही महापालिकांनी द्यावी, असे ठरविण्यात आले होते. मात्र, पाच वर्षांनंतर ही तूट कमी होण्याऐवजी अधिकच वाढत गेल्याने राज्य सरकारने दोन्ही महापालिकांवर तूट भरून देण्याची जबाबदारी टाकली आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी महापालिका शेकडो कोटी रुपये तुटीपोटी ‘पीएमपी’ला भरपाई म्हणून देते. गेल्या पाच वर्षांमध्ये ‘पीएमपी’ला मिळणारे उत्पन्न आणि ‘पीएमपी’चा खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली असून, तुटीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये पुणे महापालिकेने पीएमपी कंपनीला हिस्सा म्हणून तुटीपोटी तब्बल तीन हजार कोटी रुपये दिले आहेत. ही रक्कम दर वर्षी शंभर ते दोनशे कोटी रुपयांनी वाढत आहे. हा भार कमी करण्यासाठी पीएमपीने तिकीट दरवाढ करावी, अशी मागणी केली जाणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील आठ वर्षांमध्ये पीएमपीने तिकिटाच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावाचा विचार करून पीएमपीएलने तिकीट दरात वाढ केल्यास बसने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. गेल्या आठ वर्षांत पीएमपीचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च, कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वेतनावरील मोठ्या प्रमाणात वाढला आहे.