फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पुणे

कंपन्यांची मनमानी आणि सरकारचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही : डॉ. बाबा कांबळे

कंपन्यांची मनमानी आणि सरकारचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही : डॉ. बाबा कांबळे

९ ऑक्टोबरचा बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरा
इचलकरंजी : रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहतूकदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ९ ऑक्टोबर २०२५, गुरुवारी होणाऱ्या राज्यव्यापी संपाच्या तयारीसाठी सुरू असलेल्या जनजागृती दौऱ्याला पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याअंतर्गत आज कष्टकऱ्यांचे नेते आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांचे इचलकरंजी शहरातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत करत ९ ऑक्टोबरच्या संपात एकजुटीने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

viara vcc
viara vcc

डॉ.बाबर कांबळे यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्री आवाडे जनसंपर्क कार्यालयातील सभास्थळापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली, ज्यात शेकडो चालक-मालक आपल्या वाहनांसह सहभागी झाले होते.

यावेळी आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित करताना डॉ. बाबा कांबळे यांनी सरकार आणि ॲप-आधारित कंपन्यांच्या धोरणांवर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले, “बेकायदेशीर बाईक टॅक्सीमुळे आमचा रोजगार हिसकावला जात आहे, मुक्त परवाना धोरणामुळे रिक्षा व्यवसायात अनियंत्रित स्पर्धा निर्माण झाली आहे आणि ओला-उबेरसारख्या कंपन्या चालकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. सरकारने आमच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी केलेली नाही. आता सहनशीलतेचा अंत झाला आहे. आपल्या हक्कांसाठी आणि न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ९ ऑक्टोबरचा बंद ऐतिहासिक करून सरकारला आपली ताकद दाखवून देऊया.”

प्रास्ताविक महाराष्ट्र फेडरेशनचे कार्याध्यक्ष . अनिल बम्मन्नावर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे, IFEVa चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजीव मिश्रा (दिल्ली), ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट श्री. निवास येरोपोटो (तामिळनाडू), पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ पाटील, महाराष्ट्र कृती समिती इचलकरंजीचे अध्यक्ष संजय येलाज, फेडरेशन नेते बल्लूर स्वामी, विद्यार्थी संघटनेचे मन्सूर सावनूरकर, मुन्ना चौधरी, सचिन मस्के, अल्ताफ शेख, राजू आवळे, खालील हिप्परगी, शाहीर जावळे, राजु माळगे, दीपक जाधव, कयूम जमादार, सुनील गायकवाड, रामा कांबळे, इराण्णा गोलसंगे, समीर नांदेवाले, खाजा चौधरी, सलीम तांबोळी, इम्रान बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

संपामागे असलेल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे
* मुक्त परवाना पद्धत रद्द करा: रिक्षा व्यवसायातली अनियंत्रित स्पर्धा थांबवा.
* बेकायदेशीर बाईक टॅक्सी बंद करा: राज्यातील वाहतूक कायद्याचे उल्लंघन थांबवून रिक्षा चालकांचा रोजगार वाचवा.
* चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ : सामाजिक सुरक्षेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असलेले महामंडळ स्थापन करा.
* CNG टेस्टिंग फीची लूट थांबवा: अवास्तव वाढवलेली CNG पासिंग आणि टेस्टिंग फी पुन्हा ₹५०० करावी.
* ओला-उबेरचे दर निश्चित करा: ॲप-आधारित कंपन्यांची मनमानी थांबवून शासनाने दर निश्चित करावेत.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रिक्षा चालक-मालक उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन श्री. मल्लिकार्जुन बिल्लुर यांनी केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"