अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीला मारहाण!

पिंपरी : पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय घेऊन 29 वर्षीय तरुणाने पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असून या घटनेप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी आरोपी कृष्णा बाबुराव पांचाळ याला अटक केली आहे . याप्रकरणी लक्ष्मी शेतीबा दांडेकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचवडच्या इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये आरोपी कृष्णा पांचाळ आणि पत्नी लक्ष्मी कृष्णा पांचाळ यांच्यात कौटुंबिक कारणावरून जोरदार वाद झाला. कृष्णा हा नेहमी मद्यपान करायचा .बुधवारी देखील किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले. हे वाद शेजारी राहणाऱ्यांनी मिटवले. परंतु रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या पुन्हा वाद झाला. लाकडी फळी, वीट , सिमेंटच्या गट्टूने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने पत्नीच्या तोंडावर आणि कपाळावर मारहाण केली . मी हिला जिवंत सोडणार नाही असे म्हणत पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली .लक्ष्मी पांचाळ हिला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्नीचे इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मारहाण केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णाला अटक केली असून संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

