तडीपार आदेशाचा भंग; गुंडास अटक!

पिंपरी : तडीपार आदेशाचा भंग करून विनापरवाना पिंपरी चिंचवड आयुकलय हद्दीत प्रवेश केल्याने व लोखंडी कोयता जवळ बाळगल्याने एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 28 फेब्रुवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास नेहरूनगर रोडच्या बाजूला,एचए ग्राउंड, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे करण्यात आली.
ज्ञानेश्वर आनंदराव भुरे पोलीस शिपाई, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. पवन सचिन ससाणे (वय 21, रा. सुमेत बुद्ध विहारा जवळ, गांधीनगर, पिंपरी) असे अटक तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ससाणे यास पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांच्या आदेशाने 17 ऑक्टोबर 2025 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय , पुणे शहर पोलीस आयुक्तालय , व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षा करिता तडीपार केलेले आहे. आरोपीने तडीपार आदेशाचा भंग करून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये प्रवेश केला. याशिवाय त्याने धारदार लोखंडी कोयता आपल्याजवळ बाळगून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेला असताना कारवाई करण्यात आली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार बांबरशे हे अधिक तपास करत आहेत.

साडेसात लाख रुपये किमतीचे हातभट्टी दारूचे रसायन नष्ट!
पिंपरी: हातभट्टी दारूसाठी लागणारे सात लाख 50 हजार रुपये किमतीचे पाच हजार लिटर गूळ मिश्रित रसायन भिजत घातले असताना पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी मौजे काळुस, ता. खेड येथे करण्यात आली.
याबाबत सुमित गौतम जगताप पोलीस शिपाई ,चाकण उत्तर पोलीस स्टेशन यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल दिगंबर सीतापुरे (वय 32, रा. पत्राचाळ मोरे वस्ती, भुजबळ हॉस्पिटल चिखली, ता. हवेली) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काळुस गावच्या हद्दीत संगमवाडी, भीमा नदीचे काठावर हातभट्टी दारूसाठी लागणारे गुळमिश्रित रसायन भिजत घातले असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी तेथे छापा टाकला. या छाप्यात सात लाख 50 हजार रुपये किमतीचे पाच हजार लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन भिजत घातले असल्याचे मिळून आले. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ढमढेरे पुढील तपास करत आहेत.

