वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सदतीस दुचाकी जप्त!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ एक मधील वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने वाहन चोरी करणाऱ्या सराई टोळीचा पर्दाफाश केला आहे .पंधरा लाख रुपये किमतीच्या 37 दुचाकी आणि दोन ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत .

या प्रकरणी मुबीन नूर मोहम्मद शेख (25 ,पिंपळे गुरव ),फैज फिरोज शेख (22 ,धुळे ),अमन प्रेमचंद शुक्ला (19 ,संत तुकाराम नगर पिंपरी), सुनील शांताराम मोरे (३० ,उरुळी कांचन आणि राजू शंकर मराठे (46 ,देहूरोड )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यात दोन अल्पवयीन मुलांचा ही सहभाग उघड झाला आहे .पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोस्थानक आणि गर्दीच्या भागात वाढणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले .
पथकाने चोरीच्या घटनांमधील शंभर ते दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासले .तांत्रिक तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा मागोवा घेत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केल्याचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी सदतीस दुचाकी ,दोन ऑटो रिक्षा असा एकूण पंधरा लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .पोलीस आयुक्तालय आणि आयुक्तालयाबाहेरील वाहन चोरीचे 34 गुन्हे उघडकीस आले आहेत .ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील, पोलीस हवालदार बेंदरकर यांच्या पथकाने केली आहे.

