‘संविधानाची तोडमोड काँग्रेस कडूनच!’ – गडकरी

काटोल, नागपूर येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची काँग्रेसवर आगपाखड
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नागपूर, प्रतिनिधी: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच काँग्रेसवर स्वार्थासाठी संविधानाची तोडमोड केल्याचा आरोप केला असून, आता तेच काँग्रेस भाजपाला दोष देत असल्याचे म्हटले. काटोलमधील भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचार सभेत गडकरींनी काँग्रेस वर निशाणा साधला.
भाजप संविधान बदलणार असल्याच्या काँग्रेसच्या दाव्यांवर टीका करताना गडकरी म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आम्ही बदलणार नाही आणि कोणालाही बदलू देणार नाही. संविधानाची मूलभूत रचना बदलली जाऊ शकत नाही.”
गडकरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या केशवानंद भारती खटल्यातील निर्णयाचा संदर्भ देऊन या मुद्द्याची पुष्टी केली. ते म्हणाले, “संविधानाचे स्वतंत्रता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि मूलभूत अधिकार यांसारखे मुख्य तत्त्व कुणीही बदलू शकत नाही.”
आणीबाणी दरम्यान विशेषत: इंदिरा गांधींनी स्वार्थासाठी संविधानाचा गैरवापर केला होता, आणि असे अनेक चुकीचे निर्णय घेतल्या नंतरही, काँग्रेस संविधानाच्या गैरवापराचे आरोप भाजपवर करते असे मत गडकरींनी व्यक्त केले.
रामराज्य जनतेच्या हातात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचा संदर्भ देताना गडकरी यांनी त्यांची तुलना महात्मा गांधींच्या भारतातील “राम राज्य” च्या आदर्श व्यवस्थेशी केली. त्यांनी सांगितले, “राम राज्य प्रस्थापित करायचे असेल तर ते नेत्यांच्या हातात नाही, तर जनतेच्या हातात आहे. जात, वंश, धर्म आणि भाषा यावर आधारित मतदान करू नका. माणूस त्याच्या जातीमुळे मोठा होत नाही तर त्याच्या गुणांमुळे मोठा होतो. अस्पृश्यता आणि जातिवाद नष्ट झाले पाहिजे.”
गडकरी पुढे म्हणाले की, जे नेते गुणवत्तेवर विजय मिळवू शकत नाहीत ते निवडणुकीच्या फायद्यासाठी जातीय मतभेदांचा वापर करतात. त्यांनी नमूद केले, “जेव्हा तुम्ही उत्तम अन्न आणि आरोग्यासाठी जात पाहत नाही, जेव्हा तुम्ही प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त नेते आणि पक्ष निवडत नाही, तेव्हा तुमचे भविष्यही बदलणार नाही.”
गडकरी यांनी हेही सांगितले की, महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना लागू केल्या आहेत आणि त्या वेळी, “अनेक कल्याणकारी योजना महाराष्ट्र व केंद्र सरकार आज राबवित आहे त्यात मुस्लीम आणि दलित अर्ज करू शकत नाहीत असे कुठे नमूद केले आहे का?” हा प्रश्न उपस्थित करून भाजपवर केला जाणारा जातीयवादाचा आरोप फेटाळला.