एनसीईआरटीच्या पुस्तकांच्या किमती घटणार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या काही इयत्तांच्या वर्गांच्या पुस्तकांच्या किमती कमी होणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी केली.
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) या संस्थेमार्फत पाठ्य पुस्तकांची छपाई केली जाते. सध्या संस्थेकडून वर्षाला पाच कोटी पाठ्यपुस्तके छापली जात आहेत. आता पुढील वर्षापासून छपाईची क्षमता १५ कोटींपर्यंत वाढवण्याचे काम केले जाणार आहे. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, इयत्ता नववी ते बारावीच्या अद्ययावत अभ्यासक्रमानुसार, २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून ही कमी किमतीतील पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील. पुस्तकांच्या किमती कमी झाल्या की, पालकांवरील आर्थिक भार कमी होऊ शकेल. पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट बरोबर सामंजस्य करारही करण्यात आला आहे.
सध्या कोचिंग सेंटरची संख्या वाढलेली असली तरीही मुलांना शाळेतूनच परिपूर्ण आणि उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आमचे प्राधान्य राहील. केंद्रीय विद्यालयांमधून याचे योग्य ते परिणाम नक्कीच दिसून येतील. व्होकेशनल हा विषय आता स्किल एज्युकेशन नावाने आपण शिकवित आहोत. इयत्ता सहावीच्या वर्गासाठी कौशल्याधारित शिक्षणाचा एक विषय ठरविण्यात आला आहे. सीबीएससीच्या शाळांमध्ये एनसीईआरटीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. तसेच वेगवेगळ्या राज्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा याच अभ्यासक्रमाचे स्वरूप वापरले जाते.
(संदर्भ – पीटीआय)