फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

केंद्रीय मंत्रिमंडळाची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता

नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजाद दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!

लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू ग्रंथांच्या आधारावर मराठी भाषा अभिजात असल्याचं सिद्ध करणं सोपं झालं फडणवीस यांनी म्हटलं आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले आहेत. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आतापर्यंत तमिळ, संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि ओडिया या सहा भाषांना हा दर्जा मिळाला होता. त्यात आता मराठी, बंगाली, पाली, प्राकृत व आसामी भाषेचा समावेश झाला आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असावी. त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी. ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे, अनुवादित नसावे. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे, अशा सर्वसाधारण अटी आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"