पिंपरी-चिंचवडमध्ये 390 अनधिकृत मोबाईल टॉवर
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणात विविध मोबाईल कंपन्यांचे सुमारे 390 मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याचे उघडकीस आले आहे.

घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर राज्य शासनाने राज्यातील अनधिकृत फलकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जाहिरात फलकाप्रमाणेच विविध शहरांमध्ये धोकादायक मोबाईल टॉवर असल्याचे निदर्शनास आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अनधिकृतपणे असे मोबाईल टॉवर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील विविध मोबाईल कंपन्यांचे मोबाईल टॉवरची तपासणी केली असता,शहरात एकूण 923 मोबाईल टॉवर असल्याचे निदर्शनास आले. यापैकी 533 मोबाईल टॉवर अधिकृत असल्याचे आणि 390 मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागाने या मोबाईल टॉवरवर कर आकारणी देखील केली आहे. मात्र ही कर आकारणी जादा असल्याचे कारण पुढे करून या मोबाईल कंपन्या न्यायालयात गेल्या आहेत, यामुळे महापालिकेला कर रूपाने कोणताही पैसा मिळत नाही. मोबाईल टॉवर हे उंच इमारतीच्या टेरेसवर उभारले असल्याने धोकादायक आहेत. जाहिरात फलकाप्रमाणेच हे मोबाईल टॉवर्सचे ऑडिट होणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.