महाराष्ट्रातही सापडले एचएमपीव्हीचे रुग्ण

राज्यांना केंद्राकडून खबरदारीच्या सूचना
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघा रुग्णांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीतून समोर आले आहे. मात्र, आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत या रुग्णांची चाचणी पुन्हा करून नेमक्या आजाराची माहिती समजेल, असे नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.
नागपूरमधील मेडिट्रिना या खासगी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू होते. येथील दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी एक मुलगा सात वर्षांचा आणि आणि एक १४ वर्षांची मुलगी आहे. तीन जानेवारी रोजी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. मात्र, रुग्णालयात दाखल करून न घेताच हे दोघे आजारातून बरे झाल्याची माहिती आहे.
नागपूरमधील मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयांच्या औषधशास्त्र विभाग, श्वसनरोग विभागातील अधिकाऱ्यांकडून या आजारावर मंथन सुरू झाले आहे. अशा प्रकारचा रुग्ण आढळल्यास प्राथमिक स्तरावर काय करावे, हे निश्चित करण्यात येणार आहे. या आजारामध्ये करोना सदृश्य सौम्य लक्षणे असून मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयात रुग्ण असल्यास उपचार सहज शक्य असल्याची माहिती मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण आणि मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.
भारतात पाच रुग्ण
बंगळुरू येथे पहिला रुग्ण आढळल्यानंतर आता दोन दिवसातच एचएमपीव्ही या आजाराची रुग्णसंख्या५ झाली आहे. रुग्णांच्या आजाराच्या लक्षणासह श्वासोश्वासावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. केंद्रिय आरोग्य सचिव पुण्या सलिला श्रीवास्तव यांनी सोमवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर श्वासोश्वासाचे आजार आणि एचएमपीव्ही केसेसचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांचे नियोजन करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात एक ऑनलाइन बैठकही घेण्यात आली.