पोलिसांनी दंड मारला म्हणून ट्रॅफिक वार्डनला मारहाण!

पिंपरी : वाहतूक पोलिसांनी रिक्षावर दंड मारला म्हणून दोन रिक्षा चालकांनी मिळून पोलिसांसोबत असलेल्या ट्रॅफिक वार्डनाला लाकडी बांबूने मारहाण केली. ही घटना भोसरी येथे बुधवारी (दि. १६) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. मिलिंद भाईदास पिंपळे (वय ३२, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या वॉर्डनचे नाव आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित ऊर्फ सुम्या आणि सुभाष ऊर्फ सुभ्या (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. बुधवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी हे भोसरी येथील पुलाखालून चालले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना आवाज देऊन थांबविले. पोलिसांना १० हजार रुपयांचा दंड मारायला लावला, असा समज रिक्षा चालक सुमित ऊर्फ सुम्या यांच्यासह आरोपींचा झाला. ‘आता, दंड तूच वसूल करुन मला दे’, असे म्हणत दोघांनी लाकडी दांडक्याने फिर्यादीस मारहाण करून जखमी केले.