मेड इन इंडिया हे लष्करी शक्तीचे नवे रूप जगासमोर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने मेड इन इंडिया हे लष्करी शक्तीचे एक नवीन रूप दाखविले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत म्हणाले.
संसदेत पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला. सभागृहातील कामकाज सुरू होण्यापूर्वीच आज सकाळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर सभागृह सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांना संबोधित केले.

ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले. आम्ही ऑपरेशन सिंदूर अंतर्गत २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, जगाने भारताची लष्करी शक्ती पाहिली. पंतप्रधान पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने ठरवलेले लक्ष्य १०० टक्के साध्य झाले. मेड इन इंडिया लष्करी शक्तीचे एक नवीन रूप दाखवले आहे. जगभरात मेड इन इंडियाकडे लोक आकर्षित होत आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पहलगाम हत्याकांडाने संपूर्ण जगाला धक्का बसला. त्यावेळी पक्षीय हित बाजूला ठेवून, आमच्या बहुतेक पक्षांचे प्रतिनिधी, बहुतेक राज्यांचे प्रतिनिधी देशाच्या हितासाठी परदेशात गेले आणि दहशतवाद्यांचा स्वामी पाकिस्तान जगासमोर उघड करण्याचे काम केले. मोदी म्हणाले की, आमच्या अंतराळवीर शुभांशूचे अभिनंदन, त्यांनी आयएसएसमध्ये पहिल्यांदाच तिरंगा फडकावला. आयएसएसवर भारताचा तिरंगा फडकावणे हा देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे.
जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, २०१४ पूर्वी आपण जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होतो, आज आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत. आज २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर पडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.
१३ आणि १४ ऑगस्ट रोजी कामकाज नाही
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते २१ ऑगस्ट पर्यंत ३२ दिवस चालेल. ३२ दिवसांत एकूण १८ बैठका होतील, १५ हून अधिक विधेयके सादर केली जातील. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवामुळे १३-१४ ऑगस्ट रोजी संसदेचे कामकाज होणार नाही. केंद्र सरकार पावसाळी अधिवेशनात ८ नवीन विधेयके सादर करेल, तर ७ प्रलंबित विधेयकांवर चर्चा होईल. यामध्ये मणिपूर जीएसटी सुधारणा विधेयक २०२५, आयकर विधेयक, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी, नवीन आयकर विधेयकावर स्थापन केलेल्या संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत सादर केला जाईल. समितीने सूचना दिल्या आहेत. ६२२ पानांचे हे विधेयक ६ दशके जुने आयकर कायदा १९६१ ची जागा घेईल.

