फिर्यादीसह तिघांना कोयत्याने मारहाण!

पिंपरी: माझ्याकडे रागाने का पाहतोस असे म्हणून तिघांनी संगणमत करून फिर्यादीला कोयत्याने मारहाण करून जखमी केले आणि त्याच्या गाडीवर कोयता मारून नुकसान केले. ही घटना रविवार 18 जानेवारी रोजी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास बुद्ध विहाराच्या समोर, दत्तनगर चिंचवड, पुणे येथे घडली.
याबाबत बसवराज यल्लाप्पा हेळवार वय 21 रा. दत्तनगर, चिंचवड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आनंद गौरव कांबळे (वय अंदाजे 19), अर्जुन महादेव पात्रे (वय 26, रा. विद्यानगर, हनुमान मंदिराजवळ, चिंचवड), आशिष नंदू गवारी (वय 22 ,रा. वाल्हेकर वाडी (पूर्ण पत्ता माहित नाही) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांचे मोटरसायकल वरून भाऊ संगमेश व मित्र ऋषिकेश असे ट्रिपल सीट जात असताना दोन गाड्यांवरून यातील आरोपी क्रमांक एक ते तीन यांनी येऊन फिर्यादीचे गाडीला त्यांची गाडी आडवी मारून माझ्याकडे रागाने का बघतोस असे म्हणून नंदू गवारी याने फिर्यादीचे गाडीवर लोखंडी कोयता मारून गाडीचे नुकसान केले. तसेच आरोपी आनंद कांबळे यांनी फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडावर पोटरीवर मारून जखमी केले. फिर्यादीचा भाऊ संगमेश यास आरोपी क्रमांक दोन याने लोखंडी कोयत्याने डाव्या हातावर व डाव्या हाताच्या पंजाच्या अंगठ्यावर मारले. मित्र ऋषिकेश यास आरोपी क्रमांक तीन याने पाठीवर छातीवर व डाव्या पायाच्या मांडीवर लोखंडी कोयत्याने मारून जखमी केले. आरोपींना अद्याप पर्यंत अटक केली नाही .पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वारे हे पुढील तपास करत आहेत.
लक्झरी स्लीपर कोच गाडीने धडक: दुचाकी स्वराचा मृत्यू!
पिंपरी : लक्झरी स्लीपर कोच गाडीने धडक दिल्याने एका दुचाकी स्वराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 17 जानेवारी रोजी दुपारी पावणे बाराचे सुमारास काळेवाडी फाटा ते कस्पटेवस्ती रोड ,एसबीआय बँकेच्या समोर घडली.
याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. स्लीपर कोच गाडी नंबर एम. एच. 37 डब्ल्यू ५१ ५३ वरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्झरी स्लीपर कोच गाडी क्रमांक एम. एच. 37 डब्ल्यू ५१५३ या गाडीने एम. एच. 11 डी डब्ल्यू 88 14 या होंडा कंपनीच्या शाईन मोटर सायकल ला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव हे पुढील तपास करत आहेत.

