बावधनजवळ हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पुण्यात बावधन बुद्रुकजवळ आज सकाळी पावणे सातच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे कमी दृश्यमानता निर्माण झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अपघातात कॅप्टन गिरीश पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग हे दोन पायलट आणि विमान देखभाल अभियंता प्रीतम भारद्वाज हे तिघे मरण पावले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दोन रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल झाल्या. ऑगस्टा 109 असे या हेलिकॉप्टरचे नाव आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुण्यातील हेरिटेज एव्हिएशनचे हे हेलिकॉप्टर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने हे हेलिकॉप्टर भाड्याने घेतले होते आणि मुंबईच्या दिशेने ते निघाले होते. सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने रायगडला जाणार होते. हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनने पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे झाले.