तडीपार गुंडासह तिघांना अटक ; तीन पिस्तूल, दोन काडतुसे जप्त!

पिंपरी : पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी शस्त्र बाळगताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्यासह वेगवेगळ्या कारवायांमध्ये तिघांना अटक करून त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.
महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेदांत मच्छिंद्र मेदगे (वय १९, अवधर, खेड) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (२० ऑगस्ट) भामचंद्र डोंगराजवळ करण्यात आली. याबाबत पोलिस अंमलदार संतोष वायकर यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिरगाव येथे एका तरुणाला अनाधिकाराने गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी बुधवारी (२० ऑगस्ट) अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे एक पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचे एक काडतूस जप्त केले आहे. सचिन रमेश बंदीछोडे (२४, म्हाळसकरवाडी, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाच मधील पोलिस अंमलदार प्रशांत पवार यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंड आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत (वय २३, चिंचवड) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सप्टेंबर २०२४ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधीत संपण्यापूर्वी आकाश शहरात आला. त्याने स्वतःकडे पिस्तूल बाळगले. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे एक काडतूस जप्त केले आहे.