अफू विक्री प्रकरणी तिघांना अटक!

पिंपरी : अफू विक्रीसाठी मोशी येथे आलेल्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एक ने अटक केली ही कारवाई गुरुवारी 15 मे सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास शिवाजी वाडी मोशी येथे करण्यात आली.
राजेश सोपानराव सुरवसे (40, मोशी), नंदकिशोर मदनलाल शर्मा (39, दत्तनगर, पुणे), अशोककुमार जुगाराम सुतार (27, हांडेवाडी, पुणे. मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांचा साथीदार श्रवणसिंग (गुडामलानी, राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल तुषार वराडे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीवाडी मोशी येथे तिघेजण अफू विक्रीसाठी आले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून राजेश, नंदकिशोर आणि अशोक या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 56 हजार 80 रुपये किमतीचा 14.02 ग्रॅम अफू, 45 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन, 1400 रुपये रोख रक्कम आणि दीड लाख रुपये किमतीची दुचाकी असा एकूण दोन लाख 52 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तोंडावर मिरची पूड टाकून एकास मारहाण
पिंपरी :रिक्षाने कारला धडक दिली. त्यामुळे कारचालक खाली उतरून पाहणी करत असताना रिक्षातील तिघांनी कार चालकाच्या तोंडावर मिरची पूड टाकून बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (14 मे) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल समोर भोसरी येथे घडली.
निखिल नंदकुमार शेटे (36, भोसरी) असे मारहाण झालेल्या कारचालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल हे त्यांच्या कारमधून जात होते. श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल समोर आल्यानंतर त्यांच्या कारला एका रिक्षाने पाठीमागून धडक दिली. यामध्ये कारचे नुकसान झाले. त्यामुळे कारची पाहणी करण्यासाठी निखिल कारमधून खाली उतरले. त्यावेळी रिक्षातील तिघांनी निखिल यांच्या तोंडावर मिरची पूड टाकून स्टीलच्या रॉडने तसेच धारदार शस्त्रांनी मारून गंभीर जखमी केले. त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.