तीन कोटींच्या ऑनलाईन फसवणुकीतील तीन आरोपी जेरबंद!

सायबर पोलीसांची दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर कारवाई
पिंपरी : ‘शादी डॉट कॉम’ या मेट्रोमोनिअलवेबसाईटवरुन महिलेशी ओळख करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ३ कोटी १६ लाख ७८ हजार रुपये इतकी ऑनलाईन फसवणूक करणार्या तीन भामट्यांना पिंपरी
चिंचवड सायबर पोलिसांनी दिल्ली-हरियाणा बॉर्डरवरून जेरबंद केले.
रणजित मुन्नालाल यादव (वय २७), सिकंदर मुन्ना खान (वय २१), बबलु रघुवीर यादव (वय २५, तिघे रा. मंडीगाव,जॉनपूर, दक्षिण दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. फिर्यादी महिलेशी शादी डॉट कॉम या मेट्रोमोनिअल वेबसाईटवरुन आरोपींनी संपर्क साधला होता. आरोपीने आपण एका मोठ्या कंपनीत सीइओ असल्याचे सांगितले. विविध कारणे सांगून त्याने १० जुलै २०२३ ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीतफिर्यादीकडून ८१ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ३ कोटी १६ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यावर आरोपी गायब झाले आणि व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम कॉलचा पर करून पोलीसांना गुंगारा देऊ लागले. आरोपींनी एकाच पत्त्यावर ११ बँक खाती उघडून त्यातून पैसे वेगवेगळ्या ३०० ते ४०० खात्यात ट्रान्सफर केले होते.
रणजित यादवने स्वत:च्या खात्यावर ३६ लाख ९६ हजार रुपये घेतल्याचे उघडकीस आले. बबलु यादवने वेगवेगळ्या एटीएममधून रक्कम काढून मुख्य आरोपीकडे सुपूर्द केली. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त संदिप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, फौजदार सागर पोमण यांनी केली आहे.
”मेट्रोमोनिअल वेबसाईटवरून ओळख झालेल्या परदेशी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी त्यांची खातरजमा करावी. तसेच, अशा माध्यमातूनपैशांची मागणी केल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.”डॉ. शिवाजी पवार (पोलीस उपायुक्त)
