यंदाचा दिवाळी आनंदाचा शिधा बंद!

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाजत गाजत सुरू केलेली योजना बंद
मुंबई : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाजत गाजत सुरू केलेला शिवजयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ,गणेश उत्सव, आणि दसरा दिवाळी ,या सणासाठी आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली .मात्र या आनंदाच्या शिद्यावर विरजन पडले आहे .सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याने आनंदाचा शिधा बेआनंद झाला आहे .

यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा योजना लागू होणार नाही असे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. लाडकी बहीण योजना 40 हजार कोटी रुपयांवर जात असल्याने आणि राज्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे .गरीब आणि बीपीएल धारकांना दिवाळीत सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा मिळणे आवश्यक आहे .राज्य शासनाने फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवडणुका सरो, मतदार मरो या तत्त्वाने काम करणाऱ्या देवाभाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा या योजनेवरती देखील गदा आणलेली आहे असे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे ही योजना बंद करण्याचा नवीन फार्मूला देवाभाऊ सरकारने आणल्याचा आरोप पवार यांनी केला आहे .माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली योजना असल्याने ती बंद करण्याचा निर्णय झाला असावा अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या अनेक योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्या आहेत.

