“ही मॅन”धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड!

मुंबई : बॉलीवूडचे “ही मॅन” म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना अखेरचा निरोप विलेपार्ले येथील स्मशानभूमीत देण्यात आला आहे. यावेळी बॉलीवूड मधील अनेक दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केला .

31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या काळात धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते .नंतर त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आली होती .अनेक बॉलीवूड स्टार त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते .त्यानंतर रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले आणि घरीच उपचार सुरू होते .आमिर खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, संजय दत्त सह ,देओल कुटुंबातील हेमामालिनी, इशा देओल, सनी देओल हे सर्वजण विलेपार्ले स्मशानभूमीत उपस्थित होते.
आठ डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल असे होते .त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक होते. धर्मेंद्र यांनी एकदा सुरैया याचा चित्रपट प्रेक्षागृहात पाहिला, त्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली .त्यांनी सलग 40 दिवस हा चित्रपट पाहिला होता .धर्मेंद्र यांनी 1960 च्या “‘दील भी तेरा हम भी तेरे “या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. धर्मेंद्र यांनी ॲक्शन ,कॉमेडी, लव स्टोरी अशा प्रत्येक शैलीतील सिनेमे केले आणि प्रेक्षकांची मने जिंकली .1970 च्या दशकात धर्मेंद्र ॲक्शन हिरो म्हणून लोकप्रिय झाले .लोक त्यांना “ही मॅन “म्हणून लागले. 1975 मध्ये आलेला शोले हा चित्रपट धर्मेंद्र यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या चित्रपटाने त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ केली. त्याचबरोबर सिनेमातील बसंती म्हणजेच हेमामालिनी यांची त्यांच्या खऱ्या आयुष्यातील इंट्री झाली . “सीता और गीता” मधील त्यांची दुहेरी भूमिका असो ,वा” चुपके चुपके” हा त्यांचा विनोदी चित्रपट असो त्यांनी प्रत्येक भूमिका उत्तमरीत्या वठवली. आपल्या करिअरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या धर्मेंद्र यांनी प्रत्येक भूमिकेत लोकांची मने जिंकली. धर्मेंद्र यांना 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .त्यांना फिल्फेअर, जीवनगौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे.
करण जोहर ,करीना कपूर, कियारा अडवाणी ,शिल्पा शेट्टी, काजोल सह अनेक कलाकारांनी पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे .धर्मेंद्र यांनी 21 वर्षांपूर्वी पंजाब मधून लोकसभेची निवडणूक लढवून खासदार झाले होते .धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र हे चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व होते ,एक असाधारण अभिनेता होते, त्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली .

