स्पीडब्रेकरच्या वादातून तेरा जणांकडून मारहाण!

मुळशी तालुक्यातील सुसगाव येथील पारखेवस्ती परिसरातील घटना
पिंपरी : स्पीडब्रेकर कमी करण्यावरून झालेल्या वादातून तेरा जणांनी मिळून दोन जणांना लोखंडी गज व दगडाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील सुसगाव येथील पारखेवस्ती परिसरात घडली. तर याच्या परस्पर विरोधी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या गुन्ह्यात गणेश एकनाथ पारखे (वय ३२, रा. पारखेवस्ती, सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य महिला व अल्पवयीन बालकांसह एकूण १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरगम महेंद्र ससार (वय ३६, रा. सरगम हाईटस, पारखेवस्ती, सुसगाव, पुणे) यांनी शनिवारी (१ नोव्हेंबर) बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पारखेवस्ती ते बांदलवस्ती दरम्यान सार्वजनिक रस्त्यावरील स्पीडब्रेकर जेसीबीने कमी करण्यावरून वाद झाला. संशयितांनी एकत्र येऊन महेंद्र राम ससार व अशोक भास्कर कादे यांना दगड, स्टील दांडे आणि लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केली.
याच्या परस्पर विरोधी गुन्ह्यात दक्ष राजेंद्र पारखे (वय १७ वर्षे, रा. पारखे गार्डन चौक, सुसगाव, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेंद्र राम ससार, सरगम महेंद्र ससार, उमा भास्कर कादे, अशोक भास्कर कादे (सर्व रा. सुसगाव, पुणे) यांच्या विरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयितांनी जेसीबीच्या सहाय्याने स्पीडब्रेकर काढत असताना साक्षीदारांनी विरोध केला. त्यानंतर संशयितांनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी महेंद्र ससार याने दगड फेकून साक्षीदारांच्या डोक्यात मारहाण केली तसेच दवाखान्यात जाताना त्यांना अडवले.

“मी इथला भाई आहे” म्हणत तरुणाला मारहाण!
पिंपरी : “मी इथला भाई आहे” असे म्हणत हातगाडीवर काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला दोघांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. ही घटना मोरवाडी चौक पिंपरी येथे बुधवारी (२९ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदन गायकवाड (वय २४, रा. अजमेरा म्हाडा, मोरवाडी) व अभिषेक दिलीप भोसले (वय २५, रा. लालटोपी नगर, मोरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. मोहमद जाफर अबरार शेख (वय १८, रा. म्हाडा के बिल्डिंग, अजमेरा, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी शनिवारी ( १ नोव्हेंबर) याबाबत संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी शेख यांनी संशयितांना सिगारेट न दिल्याने आरोपी संतापले. हातातील लाकडी काठीने फिर्यादी यांच्या छातीवर मारहाण केली. दुसऱ्याने त्याला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी सार्वजनिक ठिकाणी धमक्या देत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली.

