पाचवी ते आठवी सरसकट उत्तीर्ण धोरण रद्द

नापास झाल्यास पुन्हा परीक्षा; पुन्हा नापास झाल्यास विद्यार्थी वरच्या वर्गात जाणार नाही
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करुन पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण रद्द करण्याची नामुष्की केंद्रीय शिक्षण मंत्रालयावर आली आहे. नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यामुळे पाचवी ते आठवीमध्ये विद्यार्थी नापास झाल्यास त्याला अनुत्तीर्ण असा शेरा मिळणार आहे.
अनुत्तीर्ण शेरा मिळालेल्या मुलांना पुढच्या दोन महिन्यात पुन्हा परीक्षा देता येईल. पण तेव्हाही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुढच्या इयत्तेत जाता येणार नाही. मात्र, आठवीपर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकता येणार नाही, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. मुलांमधील शिकण्याची क्षमता सुधारणे आणि शैक्षणिक कामगिरी उंचावणे यासाठी केंद्रीय शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे धोरण लागू झाले, तेव्हा शिक्षण क्षेत्रात विविध स्तरातून टीका झाली होती.
शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले की, मुलांमधील शिकण्याच्या क्षमतेत घसरण होत आहे. त्यासाठी हे पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे. मंत्रालयाने पाचवी ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. पायाभूत शिक्षणाच्या दृष्टीने ही वर्षं महत्त्वाची असतात. नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना आणि पर्यायाने शिक्षकांना सुद्धा अभ्यासाप्रति अधिक जबाबदार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.