भँवरा बडा नादान है

भारतीय चित्रपटसृष्टीतली ट्रॅजिडी क्वीन जिला म्हटलं गेलं ती म्हणजे मीना कुमारी म्हणजेच महजबीं बानो. महजबीं बानो हे नाव फार कमी लोकांना माहीत असेल. कारण, आपण तिला ओळखतो मीना कुमारी या नावानंच. ट्रॅजिडी क्वीन म्हणण्यापेक्षाही तिनं तिच्या कसदार अभिनयानं इतर वैविध्यपूर्ण भूमिका सुद्धा सिनेरसिकांना नेहमीच लक्षात राहिल्या आहेत.
सीमा देसाई
अतिशय उत्तमोत्तम कलाकृती मीना कुमारीच्या वाट्याला आल्या, असं आवर्जून आपण म्हणू शकतो. `बैजू बावरा`, `परिणीता`, `साहब बीबी और गुलाम`, `काजल`, `दिल एक मंदिर`, `पाकीजा`, `आझाद`, `सहारा`, अशा काही सिनेमांना अनेक पुरस्कार तर मिळालेच. शिवाय `दो बिघा जमीन`, `एक ही रास्ता`, `नया अंदाज`, `शतरंज`, `शारदा`, `चिराग कहाँ रोशनी कहाँ`, `दिल अपना और प्रीत पराई`, `फूल और पत्थर`, `बहारोंकी मंजिल` अशी अनेक नावं तिच्या गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत घेता येतीलच.
त्याच प्रकारे मीना कुमारी हिच्या वाट्याला आलेली सगळीच गाणी सुद्धा फार सुरेख आहेत. ऐकायला गोड आहेत. एखादं ऐकलं की आणखी पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहेत. अभिनेत्री म्हणून ओळख असतानाच एक उत्तम शायरा अर्थात ऊर्दू भाषेतली कवयित्री आणि उत्तम पार्श्वगायिका म्हणूनही तिची ओळख राहिली आहे.

अशी झाली कारकिर्दीला सुरुवात..
साधारण १९३९ पासून जवळपास १० ते १२ चित्रपटांमध्ये बेबी महजबीं अर्थात बेबी मीना ही बाल कलाकार म्हणून काम करत होती. आणि `बच्चोंका खेल` या चित्रपटापासून बेबी मीनाची `मीना कुमारी` झाली. मग तिनं मागं वळून पाहिलंच नाही. त्या काळचे बिग बॅनर सिनेमे तिला मिळत गेले. १९५२ मध्ये आलेल्या बैजू बावरा या सिनेमानं मीना कुमारीच्या रूपेरी पडद्यावरच्या कारकिर्दीची दमदार सुरूवात झाली. बैजू बावरामधली गौरी घराघरात सगळ्यांना आवडली. तब्बल १०० आठवडे हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये चालला आणि याच सिनेमासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं.
त्यानंतर १९५७ मध्ये आलेल्या शारदा सिनेमानं मीना कुमारीला ट्रॅजिडी क्वीन बनवलं. असं म्हणतात की, त्या काळतल्या आघाडीच्या सगळ्याच अभिनेत्रींनी शारदा सिनेमातली भूमिका नाकरली होती. फक्त मीना कुमारीनं होकार दिला आणि बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळवला.
मग काही वर्षांनी तिच्या आयुष्यात असा एक चित्रपट आला की ज्याचं प्रत्येक गाणं, ज्याचं कथानक, गुरुदत्तचं दिग्दर्शन आणि तिच्यासह वहिदा रहमान, स्वतः गुरुदत्त, रहमान, नाजिर हुसैन अशा कलाकारांनाही प्रेक्षकांनी, समीक्षकांनी गौरवलं होतं. `न जाओ सैय्या छुडाके बैय्या`, `भँवरा बडा नादान है`, `साकिया आज मुझे नींद नहीं आएगी` किंवा `पिया ऐसो जिया मे..` अशी एकाहून एक सरस गाणी या चित्रपटासाठी शकील बदायुनी यांनी लिहिली. तो म्हणजे साहब बीबी और गुलाम.. त्याकाळी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून हा सिनेमा निवडला गेला होता. १९६४ मध्ये आलेला चित्रलेखा हा तिचा पहिला कलर सिनेमा.

कशी झाली कमाल अमरोही यांच्याशी भेट?
१९५१ मध्ये महाबळेश्वर इथं एका अपघातात मीना कुमारी जखमी झाली होती. तेव्हा दिग्दर्शक कमाल अमरोही तिला भेटायला यायचे आणि त्या मैत्रीचं, भेटींचं रूपांतर नात्यात झालं. फक्त १९ वर्षीय मीना कुमारीनं जवळपास वयानं दुपटीनं मोठ्या असलेल्या कमाल अमरोहींशी विवाह केला. ही त्यांची तिसरी पत्नी होती. मात्र तिच्या वडिलांना हा निकाह पसंत नव्हता. त्यांनी तिला तलाक घेण्यासाठी आग्रह धरला. कमाल अमरोहीच्या सिनेमात काम केलं तर वडिलांच्या घराचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद होतील, असंही त्यांनी बजावलं. याच काळात माध्यमांमध्ये त्यांच्या निकाहची आणि संबंधित सगळ्याच घडामोडींची बातमी पसरली. अखेर वडिलांशी मतभेद होऊनच ती कमाल अमरोहींच्या घरी आली. इथे आल्यानंतरही तिला म्हणावं तसं स्वातंत्र्य मिळालंच नाही. सिनेमाच्या सेट वर तिच्या मेकअप रूममध्ये मेकअप आर्टिस्ट शिवाय कोणत्याही पुरुषाला प्रवेश मिळणार नाही आणि संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत स्वतःच्या गाडीने मीना कुमारी घरी परत जाईल, अशा अटीवर कमाल अमरोही यांनी तिला निकाह झाल्यावरही सिनेमात काम करण्याची परवानगी दिली. सुरुवातीला तिला हे सगळं मान्य होतं. पण कालांतरानं या अटींकडे ती दुर्लक्ष करू लागली.
नात्यात आला तणाव..
त्या दोघांच्या नात्यांमध्ये अभिमान, स्वाभिमान आड येऊ लागला होता. काही कारणामुळं सोहराब मोदी यांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालांशी या दाम्पत्याची ओळख करून देताना सांगितलं की, या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी आणि हे त्यांचे पती कमाल अमरोही. पण कमाल अमरोहींना हे आवडलं नाही. त्यांनी लागलीच बदल केला आणि सांगितलं की, नाही, मी कमाल अमरोही आणि ही माझी पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी.. असं म्हणून ते निघूनही गेले. कालांतराने एकदा भांडणात कमाल अमरोहींनी रागारागात मीना कुमारीला तीन वेळा तलाक तलाक तलाक असे शब्द उच्चारले आणि दोघांमध्ये तलाक झाला. पण त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप झाला. मात्र, काही धार्मिक रूढीनुसार पत्नीशी पुन्हा नातं जोडायचं तर मीना कुमारीला हलाला या प्रथेचाही सामना करावा लागला असं सांगतात.

तब्बल १४ वर्षं चित्रीकरण झालेला `पाकिजा`
साधारण १९५६ ते १९७२ म्हणजे तब्बल १४ वर्षं चित्रीकरणाचं काम चाललेला भारतीय सृष्टीतला एकमेव चित्रपट म्हणजे `पाकिजा` असावा. १९५४ मध्ये दिग्दर्शक कमाल अमरोही आणि मीना कुमारी आजाद चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने दक्षिण भारतात होते. तेव्हाच त्यांनी पाकिजाचं नियोजन सुरू केलं होतं. तेव्हापासूनच मीना कुमारीचं आजारपण सुरू झालेलंच होतं. तब्येत सातत्यानं बिघडत असताना सुद्धा तिनं पाकिजा पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. ३ फेब्रुवारी १९७२ ला मराठा मंदिर थिएटरमध्ये चित्रपटाचा प्रिमियर झाला. साधारण ३३ आठवडे तो चालला. यातल्या गाण्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर साधारण महिनाभरातच तिची प्रकृती खालावत जात होती. सततचे बिघडलेले नातेसंबंध आणि तिचा स्वच्छंदी स्वभाव यातच ती मद्याच्या आहारी गेली, त्यातच तिचं आजारपण वाढत गेलं. आणि वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी ३१ मार्च १९७२ रोजी मीना कुमारीनं अखेरचा श्वास घेतला. अनेक अजरामर चित्रपट आणि गीतांच्या माध्यमातून मीना कुमारी कायमच आपल्या स्मरणात आहे. २०११ मध्ये मीना कुमारीच्या नावानं भारतीय टपाल तिकीटसुद्धा प्रसिद्ध झालं होतं.
कुटुंबाची परिस्थिती हालाखीची म्हणून एका अनाथालयाच्या बाहेर त्या नवजात बालिकेला पित्यानं सोडलं. पण काही क्षणात पित्याचं काळीज पिळवटलं आणि त्यानं तिला तसंच उचलून पुन्हा घरी आणलं. पण जन्मानंतर अवघ्या काही दिवसात आलेलं पोरकंपण, अवहेलना, दुःख या गोष्टी जणूकाही तिच्याबरोबर आयुष्यभर राहिल्याच अगदी अखेरपर्यंत.

