दहावीचा मराठीचा पेपर आज फुटला

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्यात आजपासून माध्यमिक शालान्त परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे, आणि पहिल्याच दिवशी पेपरफुटीची घटना उघडकीस आली आहे.
राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला १६ लाखांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. मतदान केंद्रांप्रमाणे परीक्षा केंद्राच्या १०० मीटरच्या क्षेत्रात मोबाईलला बंदी करण्यात आली आहे. तरीही पेपरफुटीचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, पेपर फुटल्याचा दावा शिक्षण मंडळाने नाकारला आहे. उलट या परीक्षा केंद्रावर पालक वर्गाकडूनच दगडफेक झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यात बदनापूर येथे मराठीचा पेपर आज फुटला. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच झेरॉक्सच्या दुकानातून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरविल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमध्ये घडला आहे. सकाळी अकरा वाजता पेपरला सुरुवात झाली. या केंद्रावर १४ वर्ग असतून ३२८ विद्यार्थी परीक्षा देत होते. पेपर सुरू झाल्यानंतर अगदी पंधरा ते वीस मिनिटात मराठीची प्रश्नपत्रिका कोणीतरी बाहेर पाठविली आणि थेट झेरॉक्स सेंटरवरून उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना कॉपी पुरविली जात होती. या प्रकारामुळे आता बोर्डाकडून दहावीचा हा फुटलेला पेपर रद्द केला जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
दरम्यान, संबंधित शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्र संचालक यांच्याकडून तत्काळ अहवाल मागविण्यात येत आहे. स्वतः तहसीलदार, नायब तहसिलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांनी यात लक्ष घातले असल्याने दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी दिली आहे.