मविआला तडा; शिवसेनेचा स्वबळाचा नारा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुबंई, प्रतिनिधी : राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे अनपेक्षित निकाल हाती आल्यानंतर आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची. स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले वर्चस्व रहावे, यासाठी सगळे पक्ष कंबर कसून काम करत आहेत. अशातच महाविकास आघाडीला आज मोठा तडा गेला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे आणि राजकीय गणितांचा पट मांडून पुन्हा नवे डाव टाकायला सुरुवात होत आहे.
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रशासक आहेत. निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक महापालिकांचा कारभार सांभाळत आहेत. आता महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता लक्षात घेऊन सगळेच राजकीय पत्र तयारीला लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट हा पक्ष मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.
कार्यकर्त्यांना संधी मिळावी
कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, ती संधी मिळाली पाहिजे, म्हणून आम्ही स्वबळावर लढणार आहोत, असे खासदार राऊत यांनी सांगितले. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला संकेत दिले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
निर्णयापूर्वी चर्चा हवी होती : आव्हाड
ठाकरे गटाचा निर्णय जर झालाच असेल, तर आम्ही अडविणारे कोण?, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. उबाठा गटाच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत राऊतांनी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता, असे आव्हाड म्हणाले.