उपिंदर सिंग यांना ‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

पुणे : सरहद संस्थेतर्फे देण्यात येारा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार यंदा आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त इतिहास संशोधिका उपिंदरकौर सिंग यांना जाहीर झाला आहे. येत्या १६ जून रोजी माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी आज दिली.
सरहद संस्थेतर्फे १९९३ पासून प्रतिवर्षी संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचं यंदा १९ वं वर्ष आहे. इतिहास संशोधिक उपिंदर सिंग या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कन्या आहेत. पुण्यात एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम होणार आहे. संतसिंग मोखा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल.
या प्रसंगी रामदास फुटाणे, अरुण नेवासकर, चरणजितसिंग सहानी, सुरिंदरसिंग धुपड उपस्थित राहणार आहेत. एक लक्ष एक हजार रूपये आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र आणि पंजाबचे नाते दृढ करणार्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजविलेल्या केवळ पंजाबी व्यक्तीस प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी पंजाब केसरी वृत्तपत्र समुहाचे विजयकुमार चोपडा, चित्रपट निर्माते यश चोपडा, एस.एस.विर्क, सत्यपाल डांग, के. पी. एस. गिल, कवी गुलजार, माँटेकसिंग अहलुवालीया, प्रकाशसिंग बादल, एन. एन. व्होरा, सतपाल मलिक, ए.एस. दुल्लत, नवतेज सरना आदिंना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

