फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
महाराष्ट्र

मंत्रालयातील संरक्षक जाळीवर आदिवासी आमदारांच्या उड्या

मंत्रालयातील संरक्षक जाळीवर आदिवासी आमदारांच्या उड्या


मुंबई : धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी आणि रखडलेल्या ‘पेसा’ भरतीसाठी आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह सत्ताधारी महायुतीच्या आदिवासी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. झिरवळ यांच्यासह दोन आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन संरक्षक जाळीवर उडी घेत आंदोलन केलं. या प्रकारामुळे मंत्रालयात काही वेळ खळबळ उडाली होती. लगेचच पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले.

प्राथमिक माहितीनुसार, आपल्या मागण्यांसाठी आदिवासी आमदारांचे शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे हे आमदार आक्रमक झाल्याचे समजते. त्यानंतर झिरवळ यांच्यासह हिरामण खोसकर आणि किरण लहामाटे यांनी तिसऱ्या मजल्यावरुन संरक्षक जाळीवर उडी घत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या थोडावेळ आधीच मुख्यमंत्री आमचे ऐकणार नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार असल्याचा इशारा झिरवळ यांनी दिला होता.

आदिवासी प्रवर्गात समावेश करुन म्हणजेच अनुसूचित जमातीअंतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये आणि आदिवासी तरुणांची पेसा कायद्यांतर्गत रखडलेली भरती करण्याची मागणी त्यांची आहे. यावेळी, पेसा कायद्यांतर्गत रखडलेली भरती करण्याची मागणी करत आदिवासी तरुण अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. आदिवासी मुलांनी काही बरं वाईट करू नये यासाठी आम्ही हे पाऊल उचलल्याचं झिरवळ यांनी सांगितलं. मी आधी आदिवासी आहे, नंतर विधानसभेचा उपाध्यक्ष अन् आमदार आहे, असे पत्रकारांना सांगताना झिरवळ यांना अश्रू अनावर झाले होते. दुसरीकडे, सत्ताधारी आमदारांनाच न्याय मिळत नसेल तर जनतेला या सरकारने अडीच वर्षात काय न्याय दिला असेल, अशी टीका विरोधकांकडून होत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"