जीबीएसला घाबरू नका

पुण्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज; डॉक्टरांचे नागरिकांना आवाहन
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातला एकूण बाधितांचा आकडा १०० च्या पुढे असला तरीही उपचार तातडीने सुरू झाल्यामुळे रुग्णांनी आणि अन्य नागरिकांनीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यातमध्ये उपचारार्थ सरकारी रुग्णालये मोफत उपाचारांसाठी सज्ज झाली आहेत.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS च्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यासंदर्भात पालिकेकडून सातत्याने ताजी माहिती आणि बाधा टाळण्यासाठीच्या उपाययोजना सांगितल्या जात आहेत. यादरम्यान, आता पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची बाधा झालेल्या गरीब रुग्णांवर पालिकेकडून मोफत उपचार केले जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
सध्याच्या घडला राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या १०१ झाली आहे. पुणे महानगर पालिकेकडून यासाठी जवळपास २५ हजार ५७८ घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. राज्यात जीबीएसची बाधा झालेल्या रुग्णांपैकी ६८ पुरुष तर ३३ महिला आहेत.
मोफत उपचार
पुण्यात या सिंड्रोमचा प्रसार आणि पालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात पुणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी एएनआयला माहिती दिली आहे. यात त्यांनी पुण्यातील रुग्णसंख्येबाबतची सध्याची स्थितीही विशद केली आहे. “पुणे महानगर पालिका हद्दीत जीबीएसचे ६४ रुग्ण आहेत. त्यापैकी १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पाच रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. पुणे महानगर पालिकेकडून कमला नेहरू रुग्णालयात १५ आयसीयू बेड जीबीएस बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. इथे जीबीएसबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातील”, असं आयुक्त म्हणाले. तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘शहरी गरीब योजने’तून गरीब रुग्णांवर उपचार
“आम्ही २०० इम्युनोग्लोबलिन (Immunoglobulin) इंजेक्शन्स खरेदी केले आहेत. हे इंजेक्शन्स आम्ही ज्या खासगी रुग्णालयांमध्ये जीबीएस बाधित रुग्ण दाखल झाले आहेत, त्या रुग्णालयांना पुरवणार आहोत. जेणेकरून तिथल्या रुग्णांचा उपचार खर्च कमी होईल. त्याव्यतिरिक्त ज्या रुग्णांना उपचाराचा खर्च परवडणार नाही, अशा रुग्णांसाठी पुणे महानगर पालिकेत शहरी गरीब योजना राबवण्यात येणार आहे. त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही अशा रुग्णांच्या उपचारांचा खर्च करणार आहोत”, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
आरोग्य विभागाने शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन केले आहे. या पथकाने रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागांची पाहणी सुरू केली आहे. रुग्णांचे शौचनमुने आणि रक्तनमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठविण्यात येत आहेत. यातील काही रुग्णांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला मिळाले असून, कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला आहे. याचबरोबर पुण्यातील विविध भागांतील पाण्याचा नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेकडून तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
नागरिकांनी घाबरू नये – पालिका आयुक्त
दरम्यान, बाधितांची संख्या वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरण्याचं कारण नसल्याचं पुणे पालिका आयुक्तांनी सांगितलं. “पाण्याचे काही नमुने आम्ही तपासले आहेत. पण त्यात जीबीएसचे विषाणू आढळलेले नाहीत. तरीही आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी उकळलेलं पाणीच प्यावं. सध्याच्या परिस्थितीत घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही”, असं ते म्हणाले.