राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. परंतु, पावसाचा जोर कमी झाला असला तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांतही पावसाचं पुनरागमन होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तसच नाशिक, उत्तर महाराष्ट्रातही पाऊस बरसणार असल्याचं समजते.
उत्तराखंडमध्ये मुसळधार
उत्तराखंडमध्ये शुक्रवारी अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. पुराच्या पाण्यामुळं दोन महिलांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आलीय. राज्य आपात्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुमाऊं विभागातील उधम सिंह नगर जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हे परिसर जलमय झालं होतं. या पाण्यात अडकलेल्या 250 लोकांना सुरक्षीतपणे बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मीडिया रिपोर्टनुसार, हवामान विभागाने मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे शुक्रवारी या राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे चंपावत जिल्ह्यात आज शनिवारीही शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईतल्या पावसाचा अंदाज काय?
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २६°C च्या आसपास असेल.