पुन्हा एकदा.. “मेरे पास माँ है..“

दीवारच्या प्रदर्शनाला ५० वर्षे पूर्ण; द फिल्म हेरिटेज फाउंडेशनतर्फे दीवारचे स्क्रिनिंग
फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज खुष तो बहोत होगे तुम… किंवा मै आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता.. किंवा मेरे पास माँ है.. किंवा पीटर तुम मुझे वहाँ ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतज़ार कर रहा हूँ…या अजरामर संवादांनी एकेकाळी सिनेमा हॉल दुमदुमून जात असे. एका – एका संवादासाठी लोग थिएटरला येऊन अख्खा सिनेमा पुन्हा पाहात असत आणि पडद्यावरच्या नायकाबरोबर हे संवाद म्हणतही असत. याच अजरामर संवादांचा आवाज आता पुन्हा एकदा सिनेमा हॉमध्ये घुमणार आहे.

बॉलिवुडच्या रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरलेल्या दीवार सिनेमाचा ५० वा रिलीज वर्धापनदिन साजरा करण्याचे द फिल्म हेरिटेज फाउंडेशनने (FHF)ठरविले आहे. यश चोप्रा दिग्दर्शित दीवार या सिनेमाचा रिलीज वर्धापनदिन येत्या एक फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. हा ब्लॉकबस्टर अॅक्शन सिनेमा सलीम – जावेद यांच्या लेखणीतून उतरला होता.
२१ जानेवारी १९७५ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यंदा या सिनेमाच्या प्रदर्शनाला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. तर परवीन बाबी, नीतू सिंग, निरूपा रॉय, इफ्तेखार, मदन पुरी आणि सत्येन कप्पू यांच्यासारखे दिग्गज कलावंतही या सिनेमात होते.

द फिल्म हेरिटेज फाउंडेशनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर उल्लेख केल्याप्रमाणे मुंबईतल्या सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय रीगल सिनेमाच्या नवीन स्क्रीनवर शनिवारी (१ फेब्रुवारी) संध्याकाळी सहा वाजता दीवार दाखविला जाणार आहे.