उमेदवारांचा होऊ दे खर्च!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत तब्बल १२ लाखाने वाढ करण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची खर्च मर्यादा २८ लाख होती, आता ती ४० लाख रुपये करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २२ ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल होतील. त्यांची छाननी ३० ऑक्टोबरला केली जाईल. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २० नोव्हेंबरला मतदान, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. या सगळ्या प्रक्रियेत उमेदवारांना जो खर्च करावा लागतो, आणि निवडणूक आयोगाकडे प्रचारासाठी केलेल्या खर्चाचे जे सादरीकरण करावे लागते, त्या आकड्यात यंदा वाढ करण्यात आली आहे. आता उमेदवार ४० लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतात.
निवडणुकीसाठी उमेदवाराचा अर्ज भरण्यापासून प्रचार, फलक, पुस्तिका, प्रचाराचे पत्रक, सभा, बैठका, प्रचार फेऱ्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून उमेदवारांना खर्च करावा लागतो आणि तो खर्च निवडणूक आयोगाकडे हिशेबासह सादर करावा लागतो.