राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले!

15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी
मुंबई : राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकींसाठी आज सोमवार पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केले.

राज्यातील 29 महापालिकांसाठी तीन कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सुरुवातीला दोन डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रलंबित होत्या.
महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक
नामनिर्देशन पत्र- स्वीकारणे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर ,अर्जाची छाननी -31 डिसेंबर ,उमेदवारी माघारीची मुदत -2 जानेवारी, चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी, मतदान 15 जानेवारी, निकाल 16 जानेवारी
राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली आहे .जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत . .ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूण मतदार तीन कोटी 48 लाख, एकूण मतदान केंद्रे 39 हजार 147 राहणार आहेत.
महापालिका निवडणुकांसाठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली असून यामध्ये मुंबई सह अ वर्ग महापालिकांसाठी एका उमेदवाराला 15 लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे. अ वर्ग पंधरा लाख, ब वर्ग तेरा लाख, क वर्ग अकरा लाख ,ड वर्ग नऊ लाख मुंबई महापालिकेत एक सदस्य वार्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे तर उर्वरित 28 महापालिकांसाठी एक ते पाच सदस्य वार्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावे लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे .ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्याच्या आत सादर करावे लागणार आहे.
राज्यातील एक लाख 96 हजार 605 कर्मचारी या निवडणुकीसाठी काम करतील. मतदानाच्या आधी 48 तास प्रचारावर बंदी असेल तसेच त्यादरम्यान जाहिरातीवरही बंदी असेल .महापालिका निवडणूक नियमानुसार ही बंदी असेल. 29 महापालिकांसाठी एकूण 2869 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये 1442 महिला सदस्य, 759 इतर मागासवर्गीय सदस्य, 341 अनुसूचित जाती तर 77 सदस्य , अनुसूचित जमातीचे सदस्य असतील.
महानगरपालिका सदस्य संख्या
बृहन्मुंबई 227 ,भिवंडी निजामपूर 90, नागपूर १५१ ,पुणे 162 ,ठाणे 131, अहमदनगर ६८ ,नाशिक १२२ ,पिंपरी चिंचवड 128, औरंगाबाद 113 ,वसई विरार 115, कल्याण डोंबिवली 122, नवी मुंबई 111, अकोला 80, अमरावती 87 ,लातूर 70 ,नांदेड वाघाळा 81, मीरा-भाईंदर 96, उल्हासनगर 78, चंद्रपूर 66 ,धुळे 74 ,जळगाव 75 ,मालेगाव 84, कोल्हापूर 92 ,सांगली मिरज कुपवाड 78 ,सोलापूर 113, इचलकरंजी 76, जालना 65, पनवेल 78, परभणी 65

