भारतातील पहिले फिरते स्नानगृह कांदिवलीत

महिलांसाठी हनुमाननगर परिसरात बसमध्ये केली सोय
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : महिलांसाठी फिरते स्नानगृह उभारण्याची संकल्पना पूर्णत्वास आली असून भारतातले असे पहिले फिरते स्नानगृह मुंबईच्या उपनगरात कांदिवली येथे सुरू करण्यात आले आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकारास आला आहे. विशेषतः झोपडपट्टीच्या भागात राहणाऱ्या महिलांना याचा फायदा होऊ शकेल.
झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृह ही मोठी समस्या असते. ती समस्या सोडविण्याच्या द़ष्टीने हा उपक्रम सुरू केला आहे. मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन झाले.
कसा वापर करता येईल स्नानगृहाचा?
- कांदिवली विधानसभा क्षेत्रात उभारलेले हे स्नानगृह १२ तासांसाठी महिलांना वापरता येणार आहे.
- एका बसमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी ५ स्नानगृहे आहेत.
- बसमध्येच कपडे वाळविण्यासाठी २ ड्रायर मशीन उपलब्ध आहेत.
- विद्युत पुरविठ्यासाठी जनरेटरचा वापर करण्यात आला आहे.
- पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येकीला स्नानासाठी ५ ते १० मिनिटे वेळ असेल
- वेळ झाल्यावर पाणी पुरवठा बंद होणार आहे.
- या स्नानगृहात महिला कर्मचारी नियुक्त केल्या जातील.