पुरावा नष्ट करण्यासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह दूर नेऊन फेकला

नातेवाईक महिलेसह तिचा प्रियकर गजाआड
पिंपरी : नातेवाईक महिलेच्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्यानंतर नातेवाईक महिलेने पुरावा नष्ट करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने मृतदेह दूर नेऊन फेकून दिला. थेरगावातील जगतापनगर येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी नातेवाईक महिलेसह प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
तय्युबशहा उस्मानशा (वय ४६, रा. जगतापनगर, थेरगाव, मुळ – बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा तोसीफ तय्युब शहा (वय १८) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ३२ वर्षीय नातेवाईक महिलेसह तिचा प्रियकर साहिल वैâलास घाडगे (वय २१) या दोघांना अटक केली आहे. तसेच, एका अल्पवयीन मुलाच्या विरोधातही गुन्हादाखल केला आहे. फिर्यादी तोसीफ याचे वडील तय्युब यांच्या नातेवाईक महिलेचे आरोपी साहिल याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत. तय्युब हे गावी राहत असत. अधून-मधून ते थेरगाव येथे येत असत.
मात्र, ते थेरगाव येथे आले की नातेवाईक महिला त्यांना सतत टोचून बोलत असे. तिच्या त्रासाला कंटाळून तय्युब यांनी १४ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास नातेवाईक महिलेचा प्रियकर साहिल याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नातेवाईक महिलेच्या सांगण्यावरून साहिल याने अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन तय्युब यांचा मृतदेह मावळ तालुक्यातील दारूंब्रे या गावच्या हद्दीत फेकून दिला. तय्युब यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्राद्वारे त्यांची ओळख पटली. त्यानंतर तपासात खरा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक गुरव तपास करीत आहेत.
