लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण दुरुस्ती करणार!

अजित पवारांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती
मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजना बंद करणार नाही, पण या योजनेत दुरुस्ती करणार आहोत, अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१७) विधानसभेत केली.
लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना
लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत दुरूस्ती करणार आहोत, पण योजना बंद करणार नाहीत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार आहोत. १५०० रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल सरकारने उचलले आहे, असे पवार म्हणाले. ज्या महिलांना छोटा-मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना काढल्यास ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपल्याला आणखी एक पाऊल पुढे टाकता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
‘शिवभोजन थाळी’ आणि ‘आनंदाचा शिधा’योजना बंद नाही
अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत ‘शिवभोजन थाळी’ आणि ‘आनंदाचा शिधा’ योजनांबाबतही मोठी घोषणा केली. राज्य सरकारने या कल्याणकारी योजना बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.