मालवाहतूकदार व्यावसायिकांच्या ई चलन बाबत सकारात्मक निर्णय घ्या; अन्यथा बंदची तीव्रता वाढविणार!

असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स, पुणे या संस्थेचे कार्याध्यक्ष गौरव कदम यांचा इशारा
पिंपरी : माल वाहतूकदार व्यवसायिकांना चुकीच्या पद्धतीने “ई चलन” द्वारे दंडात्मक कारवाई करून त्रास दिला जातो. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर मंगळवारी मध्यरात्रीपासून मालवाहतूक व्यवसायिकांनी स्व इच्छेने बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. याची तीव्रता आज आणखी वाढली असून मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील ७५ टक्के व्यावसायिकांनी देखील चक्काजाम आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे.

ज्याप्रमाणे बस प्रवासी वाहतूकदार व्यवसायिकांना राज्य सरकारने आज जीआर काढून दिलासा दिला आहे, तसा जीआर मालवाहतूक व्यवसायिकांसाठी काढावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे संघटनेच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स, पुणे या संस्थेचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स, पुणे आणि पुणे बस प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे आणि प्रतिनिधी समवेत वाहतूक नगरी, निगडी येथे गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर ई चलन प्रणाली विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला.या बैठकीस कार्याध्यक्ष गौरव कदम, कार्याध्यक्ष अनिल शर्मा, उपाध्यक्ष सुमित धुमाळ, सचिव अनुज जैन, खजिनदार विनोद जगजंपी, उपाध्यक्ष सतनाम सिंग पन्नू , सह खजिनदार तेजस ढेरे, कोअर कमिटी सदस्य प्रमोद भावसार, सुभाष शर्मा, सुभाष धायल तसेच इतर वाहतूकदार व्यावसायिकांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मालवाहतूकदार व्यावसायिकांच्या ई चलन बाबतच्या मागण्या व इतर प्रश्नांकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहावे व सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा बंदची तीव्रता आणखी वाढेल असे असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स, पुणे या संस्थेचे कार्याध्यक्ष गौरव कदम यांनी सांगितले.
या राज्यव्यापी बंद मध्ये राज्यातील वाहतूक व्यवसायिकाच्या ३० संघटनांसह पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व प्रवासी व मालवाहतूक व्यवसायिकदार स्व – इच्छेने बेमुदत चक्काजाम आंदोलना सुरू केले आहे. ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेल्या प्रवासी बसमधील प्रवाशांना बसमध्ये उतरविणे किंवा चढविण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळेसाठी प्रवासी घेत असतांना व उतरवत असतांना त्या वाहनांवर पार्किंगबाबत कारवाई करण्यात येऊ नये असा आदेश परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई विवेक भीमनवार यांनी काढला आहे. याप्रमाणेच मालवाहतूकदार व्यावसायिकांना दिलासा मिळणे आवश्यक आहे त्यामुळे या चक्काजाम आंदोलनास पुणे बस प्रवासी वाहतूक संघटनेचा पाठिंबा आहे.