तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

पिंपरी : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई पिंपरी येथे रात्री उशिरा केली आहे. स्वप्नील बजरंग जाधव (वय २५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार तेजस भालचिम यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पाठीमागील बाजूला तो कोयता घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला आहे.
मोशी मध्ये महिलेचा खून, पोत्यात घालून मृतदेह निर्जन स्थळी फेकला
पिंपरी: एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्याहद्दीत जाधववाडी मोशी येथे एका अनोळखी महिलेचा खून झाला. आरोपींनी महिलेचा मृतदेह पोत्यात घालून जाधववाडी, मोशी येथील मातेरे हाऊस चौकाजवळ निर्जनस्थळी फेकून दिला. ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता उघडकीस आली. खून झालेल्या महिलेची ओळख पटली नाही. याप्रकरणी पोलीस अंमलदार शंकर रोकडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी मोशी येथील मातेरे हाऊस चौकाजवळ एका कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत निर्जन स्थळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. खून झालेल्या महिलेची ओळख पटू नये म्हणून पिवळ्या रंगाच्या पोत्यात घालून फेकून देण्यात आले. महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.