सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी!

नांदगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी आज बुधवार सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदार केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, या मतदानादरम्यानच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यात कांदे यांनी समीर भुजबळ यांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाला. यावेळी भुजबळ यांनी कुठल्याही परिस्थितीत मतदार जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आले असता कांदे यांनी आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत समीर भुजबळांना थेट मारून टाकण्याची धमकी दिल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
आज मतदानाच्या वेळेस दिवसभर घडलेल्या घटनांप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. याबाबत ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

