बास्केटबॉल लोखंडी पोल अंगावर पडल्याने विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू!

पिंपरी : बास्केटबॉल खेळताना लोखंडी पोल अंगावर पडल्याने विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार 5 एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास तळेगाव चाकण रस्त्यावरील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट येथे घडली. विशाल वर्मा (वय 20, रा. वसतिगृह तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट ,इंदोरी ,ता. मावळ, मूळ- आयोध्या ,उत्तर प्रदेश )असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव चाकण रस्त्यावरील इन्स्टिट्यूटच्या आवारात रविवारी सकाळी विद्यार्थी बास्केटबॉल खेळत होता. यावेळी विशाल वर्मा हा बास्केटबॉल रिंगला लटकला असता वजनाचा ताण वाढल्याने रिंग तुटली. त्यानंतर संपूर्ण लोखंडी पोल कोसळून त्याच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत विशाल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले ,मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला .तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत तपास करत आहेत .

जुन्या रागातून चुलत भावाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण
पिंपरी : एका व्यक्तीने आपल्या चुलत भावाला मोरवाडी कोर्टाजवळ बोलावून जुन्या रागातून सिमेंटचा गट्टू व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवार 4 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मोरवाडी कोर्टा जवळ चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी सद्दाम राजू पठाण (वय 26, युवराज पार्क, रूम नंबर पाच, नेहरूनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शकील बहादुर पठाण (वय 31, रा. पी सेक्टर पाच, अजमेरा शाळेजवळ अजमेरा, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हा आरोपीचा चुलत भाऊ आहे. फिर्यादी यांना आरोपी याने मोरवाडी कोर्टाजवळ बोलावून जुन्या रागातून सिमेंटच्या गट्टू व लोखंडी राॅड मारून जखमी केले. जखमी फिर्यादी याने वायसीएम हॉस्पिटल येथे उपचार केल्यानंतर संत तुकाराम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संत तुकाराम नगर ठाण्याचे पोलीस हवालदार पाटील हे पुढील तपास करत आहेत .

