दंगलखोरांवर कायद्यानुसार कठोर कारवाई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगल करणारे, पोलिसांवर हल्ले करणारे आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणारे यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवून नये; असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन नागपूरमध्ये काही भागात दंगल झाली. या दंगलीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. नागपूरमध्ये नेमकी कोणकोणत्या भागात दंगल झाली ? दंगलीला कशी सुरुवात झाली ? दंगलीमुळे झालेले नुकसान ? नागपूरमधील सध्याची स्थिती ? याबाबतची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. दंगल करणारे, पोलिसांवर हल्ले करणारे आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणारे यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विधानसभेत निवेदन देत मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये सोमवार १७ मार्च विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाजी कबर हटवावी अशी मागणी करत आंदोलन केले. यावेळी प्रतिकात्मक कबरीला आग लावण्यात आली. एक कापड जाळण्यात आले. या कापडावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा पसरली. ही अफवा पसरली आणि अत्तर ओळ येथून नमाज पढल्यानंतर २०० ते २५० लोकांच्या जमावाने घोषणाबाजी सुरू केली. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे केल्याने पोलिसांनी त्याठिकाणी बळाचा वापर केला.
पोलिसांनी सकाळी घडलेल्या घटनेविरोधात कारवाई करण्यासाठी तक्रारदारांना बोलवले होते. तर दुसरीकडे नागपूरच्याच हंसापुरी भागात २०० ते ३०० लोकांनी दगडफेक केली. काहींवर शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. अनेक वाहने जाळण्यात आली. हिंसाचाराची तिसरी घटना सायंकाळी साडेसात वाजता भालदारपुरा भागात झाली. ८० ते १०० लोकांचा जमाव तिथे होता. त्यांनी तिथे पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधूर व सौम्यबळाचा वापर केला. या घटनेत एक क्रेन दोन जेसीबी आणि काही वाहने जाळण्यात आली. नागपूर दंगलीत ३३ पोलीस ,जखमी पोलिसांमध्ये तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी ,यातील एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावला असून पुढील आदेश येईपर्यंत हा कर्फ्यू लागू राहील, असे पोलिस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांनी सांगितले. दरम्यान आज, मंगळवारी नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे.