मद्यधुंद चालकाची शिक्षणमंत्र्यांच्या गाडीला धडक

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना कोथरूड येथे मद्यधुंद मोटार चालकाकडून अपघाताचा आणखी एक प्रकार घडला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील मोटारीला मद्यधुंद मोटरचालकाने धडक दिली. चंद्रकांत पाटील हे अपघातातून बचावले आहेत. संबंधित मोटार चालकासह त्याचे तीन मित्र आणि दोन मैत्रिणींना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील गणेश मंडळांना भेटी देऊन चंद्रकांत पाटील निघाले असता कोथरूड परिसरात मोटार चालकाने त्यांच्या ताफ्यातील गाडीला धडक दिली. त्यामध्ये पाटील हे बचावले. पोलिसांनी तातडीने संबंधित मोटार चालक आणि मोटारीमध्ये असलेले त्याचे तीन मित्र आणि दोन मैत्रिणींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी मोटारचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या दहा दिवसांमध्ये शहराच्या विविध भागातील ६०० गणेश मंडळांना भेटी देऊन गणपतीचे दर्शन घेतल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार यावे, असे गणरायाला साकडे घातल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.