पुरंदर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता!

इंदापूर येथे एमआयडीसीला उभारण्याचे अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाने अधिकृत मान्यता दिली असून प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन अधिग्रहण प्रक्रिया एक जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर या निर्णयाची माहिती माध्यमांना मुख्यमंत्र्यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून प्रकल्पाला गती देण्यासाठी भूसंपादन व अनुषांगिक बाबीसाठी सहा हजार कोटींचे कर्ज उभारले जाणार आहे. जिल्ह्यातील रत्नपुरी मळा (ता. इंदापूर) येथे एमआयडीसीला उभारण्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची 1000 एकर जमीन नवीन औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीला हस्तांतरित करण्यात येणार आहे असे फडणवीस यांनी सांगितले.
पुरंदर येथील विमानतळामुळे उद्योजकांसाठी हा मोठा दिलासा आहे .याशिवाय बारामती येथील क्रीडा संकुलासाठी 75 कोटी 13 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तिन्ही गोष्टी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते. त्यांची इच्छा पूर्ण करून एक भावनिक साथ मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीनंतरच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण केली आहे .आजच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे आणि त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. पुण्याचे खासदार व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे पुणे व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला वेग मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय संपर्कामुळे उद्योग व्यापार व गुंतवणुकीसाठी नवे क्षितिज यामुळे खुले होणार आहे असे पुण्याचे खासदार व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. वाढती एअर कनेक्टिव्हिटी ही आयटी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, पर्यटन आणि कृषी निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वकांक्षी ठरणार आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या परस्पर समन्वयातून पुरंदर विमानतळ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.

