क्रिकेटच्या माध्यमातून खिलाडूवृत्ती जोपासली जाते : न्यायाधीश शाम रूकमे

पिंपरी : क्रिकेटच्या माध्यमातून खिलाडूवृत्ती जोपासली जाते!’ असे विचार कौटुंबिक न्यायालय पुणेचे प्रमुख न्यायाधीश शाम रूकमे यांनी अण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड बार असोसिएशन आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय विधी चषक स्पर्धा २०२५च्या पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करताना शाम रूकमे बोलत होते. याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विकास ढगे पाटील, ॲड. सतिश गोरडे, ॲड. सुहास पडवळ, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. योगेश थांबा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

न्यायाधीश शाम रूकमे पुढे म्हणाले की, वकिली व्यवसाय हा बुद्धीशी निगडित आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजात बौद्धिक ताणतणाव येतो; तसेच न्यायालयात वकिलांना हार किंवा जीत यापैकी एका गोष्टीचा स्वीकार करावा लागतो. खटला जिंकल्यावर आनंद होणे स्वाभाविकच आहे; पण हरल्यानंतर पराभवाचे दुःख पचविण्यासाठी अंगी खिलाडूवृत्ती असणे आवश्यक असते. क्रिकेट हा खेळ आपल्याला खिलाडूवृत्ती शिकवतो. सांघिक भावना वाढवतो; तसेच ते व्यायामाचे एक माध्यम असून त्यामुळे तंदुरुस्ती राखली जाते. याशिवाय पराभवातून खूप काही शिकता येते. बार असोसिएशनने पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन केले आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि विजेत्या संघांचे मनापासून अभिनंदन करतो!’
बार असोसिएशनने प्रथमच दिनांक २१ ते २३ नोव्हेंबर अशी तीन दिवसीय जिल्हा स्तरावरील क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता. त्यात पुणे, राजगुरूनगर, बारामती, वडगाव मावळ, जुन्नर, खडकी, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन या संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील विजेते संघ खालीलप्रमाणे
प्रथम क्रमांक : युनायटेड इलेव्हन, द्वितीय क्रमांक : पुणे बार असोसिएशन बी टीम, तृतीय क्रमांक : बारामती बार असोसिएशन ,चतुर्थ क्रमांक : वडगाव मावळ वॅारियर
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी न्यायाधीश एस. एन. गवळी, न्यायाधीश के. के. वाघमारे, न्यायाधीश व्ही. एन. गायकवाड, ॲड. विकास कांबळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केलीत. यावेळी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, ॲड. सुदाम साने, ॲड. अनिल तेजवाणी, ॲड. दिनकर बारणे, ॲड. सचिन थोपटे यांनी उपस्थिती दर्शवली होती. बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खांदरे यांनी प्रास्ताविक केले. महिला सचिव ॲड. रिना मगदूम यांनी आभार मानले. ॲड. गोरख मकासरे यांनी क्रिकेट सामन्यांचे धावते समालोचन केले. संयोजनात ॲड. धनंजय कोकणे, ॲड. अनिल शिंदे, ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत सरोदे, ॲड. रुद्रा पाटील, ॲड. गणेश शिंदे, अॅड. धनंजय कोरडे, अॅड. रवि मराठे, ॲड. सोहेल शेख, ॲड. आशिष गोरडे, ॲड. सूरज आंबेकर, ॲड. सचिन चौगुले, अॅड. सचिन पाटील यांनी सहकार्य केले.

